म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अत्यावश्यक सेवेत कामगिरी बजावणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना ३०० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. बेस्टप्रमाणे एसटीदेखील अत्यावश्यक वाहतूक चालवत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना ५०० रुपये प्रवासी भत्ता देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.

मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात एसटी महामंडळ अत्यावश्यक वाहतूक करत आहे. बेस्ट प्रशासनाने २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंतच्या कालावधीसाठी दैनंदिन सेवा देणाऱ्या बेस्ट कामगारांना ३०० रु.चा भत्ता जाहीर केला आहे. करोना विषाणूमुळे २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. करोना विषाणूविरोधातील लढाईत वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टर, परिचारिका, महापालिका कर्मचारी, पोलिस, बँक कर्मचारी, राज्य सरकारी आणि इतर कर्मचारी अत्यावश्यक सेवेकरता कार्यरत आहेत.

कामावर येण्यासाठी व पुन्हा घरी जाण्यासाठी एसटीच्या जवळपास ३५० ते ४०० बस अत्यावश्यक सेवा म्हणून चालवण्यात येत आहेत. त्यामुळे बेस्टच्या धर्तीवर एसटी महामंडळानेसुद्धा ५०० रुपये इतका भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना द्यावा , अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here