कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई व जोतिबा मंदिरात दर्शनासाठी असलेली ऑनलाईन बुकिंग अर्थात ई-पासची सक्ती रद्द करण्यात आली आहे. ऑनलाईन बुकिंग रद्द केल्याने आता भाविकांना नियमानुसार थेट दर्शन घेता येणार आहे. (Ambabai Temple Kolhapur News)

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने मागील ६ महिने ई-पासच्या माध्यमातून भाविकांना मंदिरात दर्शन दिले जात होते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून ऑक्टोबर महिन्यापासून अंबाबाई व जोतिबा मंदिरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. करोनाचे निर्बंध हटवल्यानंतर ही सक्ती रद्द करावी म्हणून भाविकांकडून मागणी केली जात होती. जोतिबा येथील ग्रामस्थांनी यासाठी आंदोलनही केले. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने ऑनलाईन बुकिंगची सुविधा बंद केली आहे. यामुळे आता भाविकांना थेट दर्शन मिळणार आहे.

मोठी बातमी: नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल; शरद पवारांवरील टीका भोवली

अंबाबाई मंदिरात पूर्व दरवाजातून थेट मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे, तर महाद्वारातून मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना गरुड मंडपातून मुखदर्शन घेता येणार आहे. यापूर्वी महाद्वाराच्या बंद फाटकातून भाविकांना रस्त्यावरूनच देवीचे मुखदर्शन घेता येत होते. जोतिबा मंदिराचेही दोन्ही दरवाजे खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक आणि परगावच्या भाविकांना दर्शनाचा लाभ होणार आहे.

दरम्यान, प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे भाविकांकडून आनंद व्यक्त केला जात असून या निर्णयानंतर शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here