पोलिसांची फडणवीसांना नोटीस; अजित पवारांनी सर्वच राजकीय पक्षांना केली ‘ही’ विनंती – ncp leader and dy cm ajit pawar reaction on mumbai cyber police notice to bjp devendra fadanvis
पुणे : फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईतील सायबर पोलिसांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. पोलिसांकडून फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध नेत्यांना देण्यात येत असलेल्या नोटिसांवर भाष्य करत सर्वच राजकीय पक्षांना महत्वपूर्ण आवाहन केलं आहे. (Ajit Pawar On Devendra Fadnavis)
‘वेगवेगळ्या यंत्रणांकडून देशभरात नोटिसा दिल्या जात आहेत. आपल्या देशात आणि राज्यात कधीच नव्हतं असं चित्र आता निर्माण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरही मी याबाबत काही प्रमाणात भाष्य केलं होतं. एकमेकांवरील आरोप ऐकण्यात लोकांना काहीच रस नाही. सर्वच राजकीय पक्षांना माझी विनंती राहील की लोकांनी जी जबाबदारी दिली आहे ते काम करावं,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. Mumbai Local: मुंबईत धक्कादायक घटना; लोकल ट्रेनमध्ये तरूणीवर ब्लेडने वार
यशवंतराव चव्हाण यांचा दिला दाखला
अजित पवार यांनी राजकारणातील वाढलेल्या संघर्षावर बोलताना संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचाही दाखला दिला आहे. ‘नुकतीच यशवंतराव चव्हाण यांची जयंती झाली. आम्ही त्यांचं नेहमीच स्मरण करत असतो. यशवंतराव चव्हाण यांनी पहिल्यांदा राज्याचं मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर जबाबदार पदावरील व्यक्तींनी कसं वागलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, सर्वांना सोबत घेऊन कशी वाटचाल केली पाहिजे, याचं उदाहरण घालून दिलं आहे,’ असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा आज सायबर पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात येणार आहे. पोलिसांनी थेट फडणवीस यांनाच नोटीस पाठवल्याने भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पक्षाकडून विविध ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.