मुंबई: राज्यातील कथित कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणात आरोपांची राळ उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून आणखी एक नोटीस धाडण्यात आली आहे. या नोटीसमध्ये कंपनीची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी सात दिवसांत २.५ कोटी रुपये भरा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असे नमूद केले आहे. किरीट सोमय्या यांनी ही नोटीस ट्विट केली आहे. यावरून किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सुजीत पाटकर (संजय राऊत परिवाराचे भागीदार) लाइफलाइन हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्व्हिसेसनी मला वसुली नोटीस पाठवली. १०० कोटींचा घोटाळा उघड केल्याबद्दल ही नोटीस पाठवण्यात आली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या ‘डर्टी डझन’ विरुद्धची आमची लढाई थांबणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
‘करोनाच्या भयावह काळात आम्ही मदतीसाठी पुढे सरसावलो; आता सोमय्या आमच्यावर वाट्टेल ते आरोप करतायत’
यापूर्वी १५ फेब्रुवारी रोजी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून किरीट सोमय्या यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. त्यामध्ये कंपनीने किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. किरीट सोमय्या यांनी नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांत लेखी माफी मागावी. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असे कंपनीने म्हटले होते.

‘किरीट सोमय्या राजकीय फायद्यासाठी आमच्यावर वाट्टेल ते आरोप करतायत’

किरीट सोमय्या यांच्या आरोपांच्या मालिकेनंतर लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने एक पत्रक प्रसिद्ध करुन आपली बाजू मांडली होती. करोनाची पहिली लाट शिगेला असताना मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये देशात भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कसलीच शाश्वती नव्हती. अशावेळी आम्ही आणि काही समाजसेवक कोव्हिड सेंटर स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, आज राजकीय फायद्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आम्हाला लक्ष्य करत आहेत, अशा शब्दांत लाईफलाईन कंपनीने उद्विग्नता व्यक्त केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here