कोल्हापूर : तंबाखूला लावण्यासाठी चुना मागितल्याच्या कारणावरून झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर धारदार चाकूने वार करण्यात आले. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनिल रामचंद्र बारड (वय ४७, रा. सुतार गल्ली, धामोड, तालुका राधानगरी) यांचा मृत्यू झाला आहे. राधानगरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Kolhapur Murder Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी येथील जितेंद्र केरबा खामकर आणि संशयित विकास नाथाजी कुंभार (रा. केळोशी पैकी कुंभारवाडी, तालुका राधानगरी) यांची बुरंबळी येथील निसर्ग हॉटेलमध्ये भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये तंबाखूला लावण्यासाठी चुना मागण्याच्या कारणावरून वाद झाला. विकास कुंभार याने जितेंद्र खामकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसंच पुन्हा मारण्याची धमकी दिली. कुंभार यांच्या धमकीला घाबरुन जितेंद्र खामकर याने मामा अनिल बारड यांची भेट घेतली. जितेंद्रने मामाला झालेला वाद आणि मारहाणीची माहिती दिली. त्यानंतर मामा-भाचे वाद मिटवण्यासाठी संशयित कुंभाराच्या केळोशी गावी गेले.

१० टक्के पुरावेच बाहेर आलेत, ९० टक्के बाकीच; देवेंद्र फडणवीस उद्या नवा व्हीडिओ बॉम्ब टाकणार: चंद्रकांत पाटील

मामा भाचे आलेले पाहून संशयित विकास कुंभारने शिवीगाळ करून तुम्हाला सोडतच नाही, असं म्हणत तो जितेंद्र खामकरच्या अंगावर धावून गेला. ही वादावादी सोडवण्यास गेलेल्या अनिल बारड यांच्यावर संशयित विकास कुंभारने पाठीमागून चाकूचे सपासप वार केले. जखमी अनिल बारड जमिनीवर कोसळले. त्यांना उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक कोळी पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here