औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी रात्री शहरात एकजुटीचे दर्शन म्हणून लाइट्स बंद करून दिवे लावण्यात आले. त्यावेळी झालेल्या अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना भारत नगर परिसरात घडली. त्यात महिलेचे डोके फुटले आहे.

भारत नगरच्या प्लॉट नंबर ५९ मध्ये हा प्रकार घडला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार, शहरात घरोघरी रविवारी रात्री नऊ वाजता विजेचे दिवे बंद करण्यात आले व दिवे, मेणबत्त्या पेटवण्यात आल्या होत्या. यावेळी झालेल्या अंधारात अज्ञातांनी दगडफेक केली. त्यात प्रमिला नरवडे या जखमी झाल्या. त्यांना तात्काळ जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले व उपचार करण्यात आले. दगडफेक नेमकी कोणी व का केली हे कळू शकलेलं नाही.

नेमकं काय म्हणाले होते मोदी?

‘करोनाच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी फक्त ९ मिनिटे द्या. येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा, असं आवाहन मोदी यांनी शुक्रवारी जनतेला केलं होतं. या आवाहनाला देशभर उत्तम प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी दीप उजळण्यात आले होते.

दरम्यान, करोनाच्या विषाणूविरोधात राज्याचा लढा सुरूच असून आतापर्यंत ७४८ जणांना आजाराची लागण झाली आहे. त्यापैकी ५६ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here