मी या प्रकरणात एका जबाबदार नेत्याप्रमाणे वागलो. मी त्यावेळी पत्रकार परिषदेत ट्रान्सक्रिप्ट किंवा पेनड्राईव्हमधील माहिती कोणालाही दिली नाही. या पेनड्राईव्हमध्ये अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची नावे होती. मी घोटाळा बाहेर काढला नसता तर तो दबून गेला असता. त्यावेळी माझ्याकडे असलेली माहिती संवेदनशील होती. त्यामुळे मी संबंधित अहवालाचे कव्हरिंग लेटर वगळता इतर कोणतीही माहिती सार्वजनिकरित्या उघड केली नाही. मी ही सगळी माहिती केंद्रीय गृहसचिवांना दिली. मात्र, त्याच संध्याकाळी मंत्री नवाब मलिक यांनी ही सगळी कागदपत्रे प्रसारमाध्यमांना वाटली. त्यांना ही गोपनीय माहिती उघड करण्याचा अधिकार होता का? पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे ही गोपनीय कागदपत्रे होती मग नवाब मलिक यांनी ती उघड कशी केली? त्यामुळे या प्रकरणात नवाब मलिक यांचीच चौकशी झाली पाहिजे. मला ऑफिशिअल सिक्रेसी अॅक्ट लागू होईल का माहिती नाही. पण मला व्हिसलब्लोअर्स प्रोटेक्शन अॅक्ट लागू झाला पाहिजे. मी हा घोटाळा उघड केला आहे, मी व्हिसलब्लोअर आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यापूर्वी पोलिसांनी मला प्रश्नावली पाठवली होती. त्यावर मी या प्रश्नावलीला उत्तर देईन, असे पत्रही पाठवले होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये मी सभागृहात जे काही बोललो त्यानंतर मला अचानक नोटीस येण्यामागचं कारण समजले, असेही फडणवीस यांनी म्हटले.
या पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बदल्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील स्वत:च्या भूमिकेचे समर्थन केले. मी पोलीस बदल्यांच्या घोटाळ्याची संवेदनशील माहिती प्रसिद्धी मिळवण्यासाठी न वापरता केंद्रीय गृहसचिवांना दिली. त्यामुळे माझा जबाब नोंदवून सरकारच्या हाती काहीच लागणार नाही. सरकारचे मनसुबे सफल होणार नाहीत. मी काळे कारनामे बाहेर काढणारच आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.