नियोजित मेळाव्यासाठी नांदगावकर शनिवारीच नगरला आले होते. त्यांनी शनिशिंगणापूर येथे जाऊन शनीचे दर्शन घेतले. त्यानंतर गडाख आणि विखेंचीही भेट झाली. काही प्रश्नांसंबंधी नांदगावकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात मनसेची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी कार्यकर्त्यांना काचपिचक्याही दिल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
‘पदाधिकारी बदलाचे अधिकार फक्त राज ठाकरेंना’
नांदगावकर म्हणाले, ‘नगर जिल्ह्यात मनसेला मोठा वाव आहे. कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास आपल्याला नक्कीच यश मिळेल. जुन्या कार्यकर्त्यांना सोबत ठेवून आणि नव्यांना जोडत पक्ष वाढवा. महिलांना पक्षात सामावून घ्या. समाजातील सर्व गरजू घटकाला मदत करा. अन्याय-अत्याचाराला विरोध करत लढा द्या. कोणताही पक्ष संघर्ष केल्याशिवाय उभा राहत नाही. आंदोलन हाच पक्षाचा आत्मा तर सामान्य कार्यकर्ता ही पक्षाची शक्ती असते. मनसे कार्यकर्ते जीवाचे रान करतात, तरीही आपण मागे पडतो, कारण आपल्या पदाधिकाऱ्यांचे हातात हात नाहीत. कोणीही परस्पर निर्णय घेतो. यापुढे असे चालणार नाही. पदाधिकारी बदलाचे अधिकार फक्त पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे आहेत,’ असंही नांदगावकर म्हणाले.
दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, देविदास खेडकर, बाळासाहेब शिंदे, दत्ता कोते, जिल्हा सचिव नितीन भुतारे, गणेश रंधावणे यांच्यासह तालुक्यातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.