नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज, सोमवारी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना, भाजप आणि त्या पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी नवीन खळबळजनक दावाही केला. त्यामुळे आणखी एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

संजय राऊत यांनी आज, सोमवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. निवडणुका आल्या की, अनेक मुद्दे आधी जिवंत केले जातात आणि निवडणुकांना ‘काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत…’ एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो, असे ते म्हणाले. अलीकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवर भर दिला जात असल्याचे दिसते. निवडणुका या त्यावरच लढवल्या जात आहेत. पाच वर्षांत पुन्हा त्याच जुन्या मुद्द्यांवर येतात. आता लोकांना सवय झाली आहे. लोकं सुद्धा त्यासोबत वाहून जात आहेत. चार राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजप, तर एका राज्यात आम आदमी पक्ष जिंकला आहे. विजयाचा उन्माद नको, अजीर्ण होऊ नये, तो सत्कारणी लावावा, असं सांगतानाच विरोधी पक्ष राहणे ही देशाची आणि लोकशाहीची गरज आहे, असं राऊत यावेळी म्हणाले.

Vidhansabha Adhiveshan: देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री वळसे-पाटील प्रत्युतर देणार; सभागृहात जाण्यापूर्वी म्हणाले…
Pravin Chavan: प्रवीण चव्हाण यांची नार्को टेस्ट करा; राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी

भाजपवर निशाणा

देशाचे पंतप्रधान हे कोणत्या एका पक्षाचे नसतात. हे या भाजपच्या नेत्यांना समजायला हवं. मोदी यांचे नेतृत्व देशात सगळ्यात उंच आहे हे गेली अनेक वर्षे सांगतो. पण मोदी फक्त आमच्या पक्षाचे, गटाचे आहेत, अशा प्रकारचे वातावरण भाजपचे लोक निर्माण करत आहेत. ते देशाचे नेतृत्व करतात. दुर्दैवाने त्यांची भाषणे ऐकली तर, या चक्रातून त्यांनी बाहेर पडले पाहिजे. महाराष्ट्रातील काही नेते आहेत, त्यांनाही ते समजायला हवे. काही लोकांना मोठेपण मिळाले असेल तर, ते टिकवता येत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाला सध्या तरी तोड नाही: शिवसेना
शरद पवार हे प्रमुख टार्गेट

देवेंद्र फडणवीस यांनाही राऊत यांनी टोला लगावला आहे. फडणवीस यांना विजयाचे शिल्पकार म्हटले जात आहे, या प्रश्नावर राऊत यांनी उत्तर दिलं. ‘विजयाच्या शिल्पकाराला नोटीस येऊ नये, असं कुठं म्हटलंय. नोटिसा आम्हालाही येतात. पण आम्ही तमाशे केले नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबतीत सूडबुद्धीने वागतात. त्यांना टार्गेट दिले आहेत. हे तुमचे टार्गेट आहेत. तुम्ही या टार्गेटवर हल्ले करत राहा. त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणा काम करतात. विरोधी पक्षातले टार्गेट आहेत. या देशात असं कधी घडलं नाही. शरद पवार हे त्यांचे टार्गेट आहे. त्यांना बदनाम केले जात आहे. त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जात आहे. ही कालची पोरं, काल पक्षात आलेले लोक हे पवारांविषयी ज्या भाषेत बोलतात, हे फडणवीस, नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांना तरी मान्य आहे का? जर मान्य नसेल तर, त्यांनी महाराष्ट्राचे पुढारी म्हणून त्याचे खंडन केले पाहिजे. तसेच निषेध केला पाहिजे. राजकीय मतभेद असू शकतात. पण ज्या पद्धतीची भाषा महाराष्ट्रात पवार यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाविषयी वापरली जाते, ते योग्य नाही. महाराष्ट्रात अशा लोकांचा सन्मान ठेवायला हवा, ज्यांनी महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिलं. त्यांच्याविषयी कोणती भाषा भाजपची लोकं वापरत आहेत? असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here