नीलेश राणे यांनी एक ट्विट करून राज्य सरकारला टोला हाणला आहे. ‘देशाच्या तुलनेत ५०% मृत्यू महाराष्ट्रात तरी पण आपण म्हणायचं महाराष्ट्र सरकार चांगलं काम करतंय,’ असं खोचक ट्विट त्यांनी केलं आहे. देशात करोनाबाधितांचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रात सर्वाधिक ७४८ रुग्ण सापडले आहेत. याच आकडेवारीचा आधार घेत नीलेश राणे यांनी हे ट्विट केलं आहे.
करोनाची साथ आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सरकारच्या प्रत्येक निर्णयाची माहिती जनतेला दिली जात आहे. त्यामुळं अनेकांनी राज्य सरकारच्या कामाचं कौतुकही केलं आहे. मात्र, विरोधकांना हे कौतुक रुचलेलं नाही. राज्यात करोनाचे रुग्ण सर्वाधिक असताना राज्य सरकार चांगलं काम करतंय असं कसं म्हणता येईल, असा प्रश्न विरोधकाना पडलाय. तोच नीलेश राणे यांनी जाहीरपणे मांडलाय.
राणे कुटुंब आणि शिवसेनेचं राजकीय हाडवैर आहे. शिवसेनेवर, विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राणे पितापुत्र सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांचे धाकटे चिरंजीव आमदार नीतेश राणे यांनी एक ट्विट केलं होतं. ‘अजित पवार हेच खऱ्या अर्थानं राज्य चालवताहेत. बाकीचे फेसबुक लाइव्हमध्ये बिझी आहेत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना हाणला होता. त्यानंतर आता नीलेश राणे यांनीही सरकारला चिमटा काढला आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines