गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात आणि मुंबईत करोना रुग्णसंख्येचा आलेख घसरला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत वेगाने घट होत आहे. रविवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, २४ तासांत राज्यात २५१ नवीन करोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले. मुंबईत ४४ नवीन रुग्ण आढळले. तर चार रुग्णांना रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्याचे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, ”मुंबईत आठवडाभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. ही एक चांगली बाब आहे. लोकांनी मास्कचा वापर केला पाहिजे.” दरम्यान, मुंबई महापालिकेच्या दैनंदिन अहवालानुसार, ९१ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. मुंबईसह महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
मुंबईत ४४ नवे रुग्ण
मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात रविवारी ४४ नवीन करोना रुग्णांचे निदान झाले. तर, एकूण ४६ रुग्ण बरे झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. मुंबईतील एकूण बरे झालेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या १०,३७,३४२ इतकी आहे. मुंबईत एकाही करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६, ६९२ इतकी झाली आहे.