शहरातील वडगाव शेरी या भागातील एका शाळेत आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता. परीक्षेपूर्वी आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि शिक्षकांना भेटण्यासाठी सर्व विद्यार्थी जमले होते. अशातच एका तरुणाने शाळेतच दहावीच्या विद्यार्थिनीवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने वडगाव शेरी येथील सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दुसरीकडे, मुलीवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तरुणानेही विष प्यायलं. येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेच्या आवारातच विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.