मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टाने सोमवारी, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला. कोट्यवधी रुपयांची अवैध वसुलीचा आरोप झाल्यानंतर, अनिल देशमुख यांना ईडीने २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली होती. अनिल देशमुख सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर वसुलीचा आरोप केला होता. अनिल देशमुख यांनी काही मोजक्या पोलीस अधिकाऱ्यांना रेस्तराँ आणि बारमधून दरमहिना १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप त्यांनी केला होता. अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सीबीआयने सुद्धा प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.
सध्या तुरुंगात असलेल्या अनिल देशमुख यांनी जामिनासाठी विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला होता. आज, सोमवारी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. सकृतदर्शनी मनी लॉन्ड्रिंगचे ठोस पुरावे आहेत आणि पीएमएलए कायद्यातील कलम ४५ लागू असल्याने जामीन देण्यावर मर्यादा आहेत, अशी कारणे देत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला. “देशमुख यांनी पदाचा दुरुपयोग करत भ्रष्टाचार केला आणि त्यातील सुमारे सव्वा चार कोटी रुपये दिखाऊ कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या नागपूरस्थित शिक्षण संस्थेत वळवले”, अशा आरोपांखाली ईडीने देशमुख यांना २ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.