कोल्हापूर : वीज कनेक्शन तोडणाऱ्या महावितरणच्या कारभाराविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जात असताना कोल्हापुरातही ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील विजेचं कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. कार्यालयात दुपारी ग्रामस्थांनी अंगावर डिझेल ओतून घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. (Farm Power Supply)

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील महे, कसबा बीड, वाशी या गावांच्या पाणीपुरवठ्याची वीज महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी तोडल्याचं सांगितलं जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील वीज खंडित केल्याने गावकरी आक्रमक झाले. संतापलेल्या ग्रामस्थांनी आज थेट महावितरण कार्यालयात धडक मोर्चाचे आयोजन केलं. त्यानंतर महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर ‘व्हिडिओ बॉम्ब’; आज दुसरा पेन ड्राइव्ह केला सादर

महावितरणचे अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. महावितरण कार्यालयात ग्रामस्थांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

दरम्यान, वीज बिल वसुलीसाठी महावितरणने राज्यभरातच वीज तोडणीची मोहीम हाती घेतली आहे. शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकऱ्यांची हाता-तोंडाशी आलेली पिके करपून जात आहेत. त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आणखीनच अडचणीत आला असून महावितरणसह राज्य सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here