मुंबई : सध्या सर्वत्र ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. सामाजिक माध्यमांवर नेटकरी या चित्रपटाशी संबंधित वेगवेगळी मते, प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मात्र, या चित्रपटाची निर्मिती आताच का करण्यात आली, यामागचा उद्देश काय, याबाबत काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट निर्मितीचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही, तर तो राजकीय आहे. ऐतिहासिक घटनांची मोडतोड व चित्रपट निर्मिती करणारे भाजपशी संबंधित असणे हा योगायोग नाही. काश्मिरी पंडितांनी काश्मिरमध्ये परत कधी जायचे? हे मोदी सरकारला विचारावे, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत म्हणाले.

देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून त्या भळभळत राहतील हे पाहत असते. द्वेषातून सत्तेसाठी मतांचे पीक मिळवण्याचा त्यांचा उद्देश असतो. देशभक्त सरकार नागरिकांमध्ये प्रेम निर्माण करते आणि जुने व्रण विसरायला लावते. एकतेने देश मजबूत होतो. दुर्दैवाने देशात गेली आठ वर्षे देशविरोधी सरकार आहे, असे सावंत म्हणाले. भाजपने गेली अनेक वर्षे प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये स्थापित केले जाईल, हे आश्वासन दिले होते आणि ध्रुवीकरणासाठी या मुद्द्याचा उपयोग केला. ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला अशी बोंब ठोकली. आता काश्मिरी पंडीत कधी परतणार? या प्रश्नाचे उत्तर मोदी सरकारकडे नाही. पण देशात द्वेष पसरवून मते मिळवण्यासाठी भाजपतर्फे अजूनही काश्मिरी पंडितांचा वापर केला जात आहे. हा चित्रपट प्रदर्शित करणे हा भाजपचा राजकीय अजेंडा आहे. म्हणूनच मोदी सरकारमधील मंत्री व भाजप नेते या चित्रपटाचा उदोउदो करत आहेत, असा आरोप सावंत यांनी केला.

फडणवीसांचे सरकारवर गंभीर आरोप; गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले प्रत्युत्तर
मोदी.. मोदी… अशा घोषणांनी लोकसभा दणाणली, खासदारांनी PM मोदींना दिले स्टँडिंग ओवेशन

हा चित्रपट बघून येणाऱ्या प्रेक्षकांना काही ठिकाणी भाजप कार्यकर्ते ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास भाग पाडत आहेत. पण श्रीरामाने रावणाचा द्वेष केला नाही व कैकयीला क्षमा केली हे पाहा. श्रीरामाने दाखवलेला मार्ग क्षमाशीलतेचा आहे, द्वेषाचा नव्हे. जर आठवणच ठेवायची तर, ही जरूर ठेवा की पंडितांचे काश्मीरमधून अत्याचारांमुळे जबरदस्तीने विस्थापन झाले. त्यावेळी केंद्रात भाजपच्या पाठिंब्यावर व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती व राज्यपाल जगमोहन होते, असे सचिन सावंत यांनी सांगितले. जगमोहन यांच्या वर्तनामुळेच काश्मिरी पंडितांचे विस्थापन झाले व भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकीय मुद्दा मिळाला. जगमोहन यांना बक्षीस म्हणून भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले.

‘त्या’ आरोपांंमुळे अजित पवार भडकले; म्हणाले, होऊन जाऊद्या…

हेच जगमोहन पुढे भाजपतर्फे तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले व वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही झाले. याची आठवण सावंत यांनी करून दिली. ज्या व्यक्तीमुळे काश्मिरी पंडितांना अत्याचार सहन करावे लागले, त्याला राजकीय शिक्षा देण्याऐवजी बक्षिशी का दिली? याचे उत्तर भाजप नेत्यांनी काश्मिरी पंडितांना द्यावे, असे सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here