मुंबई टाइम्स टीम

दोन वर्षांत मनोरंजनसृष्टीचं कंबरडं मोडल्यानं, कमाईची गाडी पुन्हा रुळांवर केव्हा येईल आणि बॉक्स ऑफिसला यंदा तरी चांगले दिवस येतील का, असा प्रश्न निर्माता-दिग्दर्शकांना पडला होता. विशेष म्हणजे, चित्रपटगृहं पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांची पावलंही मोठ्या पडद्याकडं वळू लागली आहेत. पहिल्या तिमाहीत ‘सूर्यवंशी’, ‘पुष्पा’ (हिंदी), ‘८३’ या कलाकृतींपाठोपाठ ‘गंगूबाई काठियावाडी’नं शंभर कोटी क्लबचा टप्पा गाठला आहे. मराठीतही ‘पावनखिंड’, ‘झिम्मा’, ‘पांडू’, ‘डार्लिंग’ या चित्रपटांनी चांगली कमाई केल्यानं मनोरंजनसृष्टीत उत्साहाचं वातावरण आहे.

वर्षाची सुरुवात अक्षयकुमारच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटानं झाली. दीर्घ काळानं चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक रोहित शेट्टीनं मनोरंजनाचा पुरेपूर मसाला वापरून ही कलाकृती प्रेक्षकांसमोर आणली. गाणी, मसालेदार संवाद, कलाकारांची फळी या जोरावर चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करून गेला. त्यानंतर दाक्षिणात्य ‘पुष्पा’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसला हात दिला. हिंदीत डब झालेल्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया असल्या, तरी गाणी, संवाद आणि जाहिरातबाजी या जोरावर चित्रपटानं शंभर कोटींचा टप्पा सहज गाठला. भारतीय क्रिकेट संघानं १९८३ मध्ये जिंकलेली वर्ल्डकपची कथा ‘८३’नं मोठ्या पडद्यावर आणली. रणवीरसिंह आणि दीपिका पदुकोण या जोडीसह चित्रपटातल्या सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना आवडून गेला. कलेक्शनमध्ये चढ-उतार होत असतानाही, वीकेंड बिझनेसच्या जोरावर हा चित्रपटही शंभर कोटी क्लबमध्ये दाखल झाला.
वयाच्या १० व्या वर्षी कुटुंबातील व्यक्तीनं केला विनयभंग… ‘लॉक अप’मधील स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’कडून प्रेक्षकांना अपेक्षा होत्या. भन्साळी यांची चित्रपट मांडण्याची परंपरा लक्षात घेत, या कलाकृतीतही भव्यदिव्य मांडणी आणि आकर्षक संगीत याची अपेक्षा केली जात होती. कथा, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय या जोरावर हा चित्रपटही नुकताच शंभर कोटींचा व्यावसाय करून गेला. ‘पुढील काळात अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहेत; त्यामुळे बॉक्स ऑफिसला मिळालेली ही उभारी भविष्यातही कायम राहील,’ असा विश्वास चित्रपटतज्ज्ञ आणि विश्लेषक तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतही उत्साहाचे वारे
यंदा मराठी मनोरंजनसृष्टीनंही यशाची चव चाखल्यानं, आगामी काळात हेच चित्र कायम राहील असं दिसत आहे. ‘झिम्मा’, ‘पांडू’ या चित्रपटांना रसिकांचा प्रतिसाद मिळाला. ‘डार्लिंग’ या चित्रपटानंही युवा प्रेक्षकांची दाद मिळवत यश मिळवलं. त्या पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटानंही इतिहासातल्या शौर्याचं सोनेरी पर्व मोठ्या पडद्यावर आणलं. या कलाकृतीला रसिकांची दाद मिळाली असून, हिंदी चित्रपटांसमोरही ही कलाकृती टिकून आहे. आगामी काळातही लहान-मोठे मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून, त्याचं नियोजन मराठी मनोरंजनसृष्टी कसं करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here