एलिझाबेथ पिंगळे या मुलुंडच्या रहिवाशी आहेत. त्या इस्रायलला आजारी वडिलांना भेटायला गेल्या होत्या. पण दुर्देवाने त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याने त्यांना तिथे थांबावं लागलं होतं. त्या २१ मार्चला निघून २२ मार्चला नवी दिल्लीत पोहोचल्या. संध्याकाळी मुंबईचे विमान होते. परंतू त्यांना क्वॉरंटाइन होण्यास सांगितले गेले. त्या हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन झाल्या. १४ दिवसानंतर अचानक हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना हॉटेल बंद होत असल्याचे कारण सांगत त्यांची सोय दुसऱ्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली व ते पसंत नसल्यास स्वत:ची व्यवस्था स्वत: करण्यास सांगितले. त्यामुळे एलिझाबेथ यांनी स्वत:सह महाराष्ट्रातील ४० जण हॉटेलमध्ये अडकल्याचा एक व्हिडिओ तयार करून तो व्हॉट्सअॅपवर टाकला. या व्हिडिओची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एलिझाबेथ पिंगळे यांच्याशी येथे दूरध्वनीहून संपर्क साधला आणि त्यांची महाराष्ट्र सदन येथे राहण्याची व्यवस्था केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल असा विश्वास देणारा फोन त्यांना केला. मुख्यमंत्र्यांनी ताई, म्हटले आणि मला माझा भाऊच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यासारखे वाटले. मुख्यमंत्र्यांनी मला मदत केली. मी आताच महाराष्ट्र सदन मध्ये राहण्यासाठी आले. आता मुंबईला कधीही जायला मिळो, मला आत्ताच घरी आल्यासारखे वाटतेय, माझ्या लोकांमध्ये आल्यासारखे वाटतेय, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
विविध देशातून महाराष्ट्रात जाण्यासाठी आलेले नागरिक क्वॉरंटाइनमुळे आणि नंतर लॉकडाऊनमुळे राज्यात परत जाऊ शकले नाहीत. यात इटलीहून परतलेले १५ विद्यार्थीही आहेत. या सर्वाची लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत महाराष्ट्र सदनात व्यवस्था करण्यात आली आहे. काही जण राहण्यासाठी सदनात आले देखील आहेत. उर्वरित लोक त्यांचा क्वॉरंटाइन कालावधी संपल्यानंतर आरोग्य विभागाच्या मान्यतेने सदनात दाखल होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times