जळगाव : शहरातील गिरणा पंम्पिंग परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेला गुराखी रविवारी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या बेपत्ता गुराख्याचा मृतदेह सोमवारी सकाळी सावखेडा शिवारातील फिल्टर प्लॅन्ट परिसरात डोहात आढळून आला आहे. केशव शंकर इंगळे (वय-५५, रा. सावखेडा) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. (Jalgaon Crime News)
जळगाव तालुक्यातील सावखेडा येथील केशव शंकर इंगळे हे गुराखी असून त्यातून मिळणार्या उत्पन्नातून ते कुटुंबाचा उदनिर्वाह करत होते. गुरे चारण्यासाठी केशव इंगळे हे गिरणा पंपिंग परिसरात जातात. नेहमीप्रमाणे ते रविवारी सकाळी गुरे चारण्यासाठी गिरणा पंपिंग परिसरात गेले होते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी संपूर्ण परिसरात त्यांचा शोध घेतला. परंतु ते आढळून न आल्याने कुटुंबियांनी तालुका पोलीस ठाण्यात रविवारी हरवल्याची नोंद केली होती. नुरा कुस्ती खेळू नका, तेल लावलेल्या पैलवानासारखे मैदानात या, आंबेडकरांचं फडणवीसांना आव्हान
दरम्यान, आज सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास इंगळे यांचा मृतदेह गिरणा नदीपात्रातील फिल्टर प्लॅन्ट परिसरातील डोहात आढळून आला. मात्र इंगळे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबतची नेमकी माहिती अद्याप मिळू शकली नाही.
नदीपात्रात मृतहेद आढळून आल्याची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोलीस कर्मचारी अनिल फेगडे, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत गावकर्यांच्या मदतीने मृतदेह डोहातून बाहेर काढला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.