सांगली महापालिकेच्या वतीने विजयनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात आलं आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी स्मारकासाठी खर्च करण्यात आला आहे. करोनाच्या संकटामुळे गेल्या २ वर्षांपासून स्मारकाचं लोकार्पण रखडलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते २ एप्रिल रोजी स्मारकाचे लोकार्पण करण्याचं महापालिका प्रशासनाने निश्चित केलं आहे. त्याची जय्यत तयारीही राष्ट्रवादीकडून सुरू आहे. मात्र स्मारकाच्या लोकार्पणावरून आता श्रेयवादाचे राजकारण रंगलं आहे. २ एप्रिल रोजी होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्याची मागणी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे भाजपने केली आहे.
माजी महापौर संगीता खोत, जेष्ठ नगरसेवक शेखर इनामदार, नगरसेवक संजय यमगर, प्रकाश ढंग, सविता मदने, अस्मिता सलगर यांच्यासह अन्य नगरसेवक व पदाधिकार्यांनी आयुक्त कापडणीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
दरम्यान, सर्व पक्षांना विश्वासात घेऊन लोकार्पणाची तारीख जाहीर करायला हवी होती. हा कार्यक्रम प्रशासकीय कार्यक्रम असून यामध्ये सर्व पक्षांना विश्वासात घेऊन कार्यक्रम पत्रिका तयार करावी, असा आग्रह भाजपने धरला आहे. त्यासाठी येत्या शुक्रवारी १८ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याबाबत नियोजनावर चर्चा होणार आहे. राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा घेण्याचं नियोजन भाजपकडून सुरू आहे. तोपर्यंत २ एप्रिल रोजी होणारा स्मारक लोकार्पण सोहळा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.