युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन‘नं (NATO) युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू असताना रशियाच्या सीमेजवळ नॉर्वेमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केलंय. या लष्करी सरावात ३० हजार सैनिक, ५० युद्धनौका आणि २०० लढाऊ विमानं सहभागी झाली आहेत. नाटोकडून नॉर्वेत विमानवाहू जहाज, एक विनाशक जहाज आणि आण्विक शक्तीवर चालणारी हल्ला पाणबुडी पोहचवण्यात आलेत. या लष्करी सरावाच्या माध्यमातून ‘नाटो‘कडून रशियाला स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं मानलं जातंय.
हे ३० हाजार सैनिक अमेरिकेसहीत २८ युरोपीय देशांशी संबंधित आहेत. सोमवारी सुरू झालेला हा अभ्यास पुढच्या महिन्याभरापर्यंत सुरू राहील. नॉर्वे आणि रशियाची संलग्न सीमा जवळपास २०० किलोमीटर लांबवर पसरलेली आहे. त्यावरूनच या लष्करी सरावाचं महत्त्व लक्षात येऊ शकतं. या अभ्यासाला ‘कोल्ड रिस्पॉन्स’ असं नाव देण्यात आलंय.
रशियाच्या सीमेपासून काहीशे किलोमीटर अंतरावर हा सराव सुरू आहे. सरावादरम्यान हे सैनिक नॉर्वेच्या समुद्रकिनारी असलेल्या भागात युद्धनौकेवरून उतरण्याचा सराव करतील.
एअरक्राफ्ट कॅरियर ‘एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स’ हेदेखील या सरावात भाग घेणार आहे तसंच ‘फ्रिगेट एचएमएस रिचमंड’सह अनेक प्राणघातक युद्धनौकांचाही यात सहभाग आहे.
सोबतच, या युद्धाभ्यासाचा आणि रशियाच्या युक्रेनवरल अवैध आक्रमणाचा कोणताही संबंध नसल्याचा दावा नाटोनं केलाय. या युद्धाभ्यासाची योजना व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर केलेल्या हल्ल्याअगोदरपासूनच आखण्यात आली होती. हा अभ्यास दरवर्षी आयोजित केला जातो आणि एप्रिल महिन्यात तो संपुष्टात येतो, असंही नाटोनं स्पष्ट केलंय.
तसंच कोणतेही गैरसमज टाळण्यासाठी यासंबंधात रशियन सेना आणि संरक्षण मंत्रालयालाही पूर्वसूचना देण्यात आली आहे, असं नॉर्वेच्या सेनेनं म्हटलंय.