मुंबई: पंतप्रधान मोदींच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दाखवण्यासाठी भाजपचे आमदार यांनी ट्विट केलेल्या फेक फोटोवरून काँग्रेसनं भाजपवर बोचरी टीका केली आहे. ‘अकलेचे दिवे लावणं याला म्हणतात. भाजपचे लोक देशाला मूर्ख बनवण्याचा उद्योग करत आहेत. जागे व्हा,’ अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

‘करोनाविरुद्धच्या लढाईत सामूहिक शक्ती दाखवा. त्यासाठी फक्त ९ मिनिटे द्या. येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती लावा, असं आवाहन मोदी यांनी केलं होतं.

मोदींच्या या आवाहनाची विरोधकांनी खिल्ली उडवली होती. आरोग्य व्यवस्थेकडं लक्ष देण्याची गरज असताना पंतप्रधान इव्हेंट करत असल्याची टीका अनेकांनी केली होती. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी मोदींच्या आवाहनाकडं दुर्लक्ष करण्याची विनंतीही जनतेला केली होती. सोशल मीडियावरही मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवणाऱ्या मीम्सचा पाऊस पडला होता. असं असूनही देशात मोदींच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

भातखळकरांनी ट्विट करून नंतर डिलिट केलेला हाच तो फोटो

दीप प्रज्वलनानंतर आमदार भातखळकर यांनी एक फोटो ट्विट केला होता. ‘हसणाऱ्यांचे दात घशात घालत देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद दिला. करोनाच्या अंधकारात आशेचा दिवा प्रज्वलित केला. करोना संकटाच्या विरोधात देश एकजूट होऊन उभा राहिला. हे पहा अवकाशातून उपग्रहानं टिपलेलं छायाचित्र,’ असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, हा फोटो फेक असल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठली. चूक लक्षात येताच भातखळकर यांनी लगेचच हे ट्विट डिलिट केलं. मात्र, त्यांच्यावर टीका सुरूच आहे.

सचिन सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून भातखळकर यांची खिल्ली उडवली आहे. ‘हा हा हा! जंगलात, दऱ्या खोऱ्यात, पर्वत रांगांमध्ये पण दिवे लागले बरं! प्राण्यांना पण दिवे पोहोचविले होते का?,’ असा सवाल सावंत यांनी केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here