शिवसेनेने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत तीन सहसंपर्क प्रमुख होते. सतीश हरडे यांनी पदाचा राजीनामा दिला तर शेखर सावरबांधे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. किशोर कुमेरिया यांनी अघोषित बहिष्कार टाकल्याप्रमाणे स्थिती होती. संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यासोबत आता सहसंपर्कप्रमुखपदी मंगेश काशीकर यांची राहतील. त्यांना संघटकपदावरून बढती देण्यात आली. त्यांच्याकडे पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपूरची जबाबदारी आहे. शहर संघटक विशाल बरबटे यांच्याकडे दक्षिण, पूर्व आणि उत्तर तर, किशोर पराते यांच्याकडे दक्षिण-पश्चिम, मध्य व पश्चिम नागपूर आहे.
शहरात आधी दोन प्रमुख होते, आता तीन करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी स्वगृही परतलेले प्रवीण बरडे यांना शहरप्रमुख करून पूर्व व मध्य नागपूरची जबाबदारी दिली. आधीचे शहरप्रमुख नितीन तिवारी व दीपक कापसे यांचा प्रत्येकी एक मतदारसंघ कमी झाला. तिवारी यांच्याकडे पश्चिम व उत्तर तर, कापसे यांच्याकडे दक्षिण व दक्षिण-पश्चिम नागपूर आहे. कुमेरिया यांना पक्षाने संधी दिल्याने असंतुष्ट गटाला मोठा दिलासा मिळाला. बरडे यांच्याकडे शहरप्रमुखपद आल्याने निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा आहे. संघटनेत अद्याप संधी मिळाली नाही, अशा नवीन चेहऱ्यांना संधी देणे अपेक्षित होते, असे असंतुष्ट गटाकडून सांगण्यात आले. बसपतून आलेले सुरेश साखरे यांना एक विधानसभेची जबाबदारी देणार होते. सामाजिक समीकरणाच्या आधारे विदर्भ पातळीवर त्यांना संधी मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.