मॉस्को, रशिया :

रशियाच्या एका महिला नागरिकाच्या साहसाची प्रशंसा जगभरात होतेय. रशियाच्या सरकारी टीव्ही नेटवर्कशी संबंधित ‘चॅनल वन‘ या वाहिनीवर संपादक म्हणून ही महिला कार्यरत होती. आपण काम करत असणाऱ्या टीव्ही चॅनलवरून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यांचं प्रशासन प्रोपोगंडा फैलावत असल्याचा आरोप करत महिलेनं युक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्याचा जोरदार निषेध केला. या महिलेचं नाव मरिना ओवस्यान्निकोव्हा असल्याचं समजतंय.

‘चॅनल वन’वर लाईव्ह न्यूज प्रसारण सुरू असतानाच मरिना स्टुडिओच्या आत घुसली. यावेळी, बातम्या देणाऱ्या वृत्तनिवेदिकेच्या पाठी उभं राहणाऱ्या मरिनाच्या हातात एक पोस्टरही होतं. ‘प्रोपोगंडावर विश्वास ठेवू नका. युद्ध बंद करा. युद्ध नाकारा’ असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

लाईव्ह टीव्ही दरम्यान घडलेल्या या प्रकाराचा एक व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मानवाधिकार गटांकडून या महिलेच्या धाडसाचं कौतुक करण्यात येतंय. रशियन पोलिसांनी ‘चॅनल वन’च्या संपादक मरिना ओवस्यान्निकोव्हा यांना ताब्यात घेतल्याची माहिती मानवाधिकार कार्यकर्त्यांनी दिलीय. मरिना ओवस्यान्निकोव्हा यांचे वडील युक्रेनचे रहिवासी आहेत तर त्यांची आई मूळ रशियन आहे.

NATO War Games: रशियाला घेरण्यासाठी ‘नाटो’ मैदानात? नॉर्वेत युद्धाभ्यास सुरूRussia Ukraine War: चर्चेआधी तातडीनं युद्धबंदीची गरज, युक्रेनची मागणी
लाईव्ह टीव्हवर ही घटना घडण्यापूर्वी मरिना यांनी आपला एक व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. ‘मला चॅनल वनसाठी काम करण्याची लाज वाटतेय. युक्रेनमध्ये सध्या जे काही घडतंय तो गुन्हा आहे. दु:खद गोष्ट म्हणजे मी चॅनल वनमध्ये काम करतेय. रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलिनच्या प्रोपोगंडावर काम करतेय’ असं म्हणत मरिना यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दाव्यांची पोलखोल केली.

‘मी काम करत असलेल्या टीव्ही चॅनलवरून धादांत खोट्या गोष्टी परवण्यात आल्या आणि त्या आम्ही प्रसारित होऊ दिल्या. त्यामुळे मी लज्जास्पद परिस्थितीत आहे’ असंही मरिनानं या व्हिडिओत म्हटलंय. ‘घाबरू नका आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करा. राज्यकर्ते सगळ्याच नागरिकांना तुरुंगात टाकू शकत नाहीत’, असं आवाहनही मरिना ओवस्यान्निकोव्हा यांनी रशियन जनतेला केलं.

मरिना ओवस्यान्निकोव्हा यांच्या फेसबुक पेजवर अनेकांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केलाय. तसंच त्यांच्या या धाडसाचं कौतुकही केलं जातंय. चॅनल वन हे रशियाचं सर्वात लोकप्रिय सरकारी टीव्ही चॅनल आहे. बातमीचा सर्वांगीण विचार न करता पुतीन यांच्या प्रोपोगंडाला हातभार लावण्यासाठी हे चॅनल ओळखलं जातं.

रशियाला चीनची मदत?; लष्करी उपकरणे मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा अमेरिकेचा आरोपCovid19: ओमिक्रॉन आणि डेल्टा मिश्रित नव्या व्हेरियंटचा चीनला धसका, जगभरात चौथी लाट पसरणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here