राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधताना वृत्तवाहिन्यांच्या बेजबाबदारपणावरही बोट ठेवलं. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अशा परिस्थितीत दिल्लीत मरकजचा धार्मिक मेळावा व्हायला नको होता. महाराष्ट्र सरकारने जशी मरकजच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तशीच दिल्लीतही परवानगी नाकारायला हवी होती. दिल्लीत थोडी खबरदारी घेतली असती तर बरंच नियंत्रण आलं असतं, असं पवार म्हणाले.
दिल्लीत खबरदारी घेतली असती तर वृत्तवाहिन्यांवरून एखाद्या वर्गाचं वारंवारं वेगळ चित्रं निर्माण केलं गेलं नसतं. एखाद्या वर्गाचं असं चित्रं निर्माण करून त्यात सांप्रदायिक भर घालण्याची संधी वृत्तवाहिन्यांना मिळाली नसती, असं सांगतानाच दिल्लीत जे घडलं ते रोज दाखवण्याची गरज आहे का? त्यातून आपण कोणती परिस्थिती निर्माण करू पाहतोय, याचा विचार वृत्तवाहिन्यांनी करण्याची गरज आहे, असं परखड मत पवार यांनी व्यक्त केलं. सामाजिक समतोल ढासळेल आणि कटुता वाढणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
पाचपैकी चार मेसेज खोटे
पवार यांनी यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजवरही चिंता व्यक्त केली. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारे पाचपैकी चार मेसेज खोटे आहेत. या मेसेजमधून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. पुन्हा पुन्हा हे मेसेज व्हायरल करून खळबळ माजवली जात असून यामागे कुणाचे षडयंत्र आहे का? याची शंका येते, असंही ते म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times