प्रकाश आंबेडकर मंगळवारी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी हिजाबसंबंधी कर्नाटकातील न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, ‘कर्नाटकातील ज्या महाविद्यालयात हिजाबवरून वाद झाला आहे, ते महाविद्यालय ज्या विद्यापीठातंर्गत येते, त्या विद्यापीठाने महाविद्यालयाला ड्रेसकोड निश्चित केला होता का? हा प्रश्न आहे. विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयाला ड्रेसकोड निश्चित केला असेल तर तो निर्णय महत्त्वाचा आहे. तो संबंधित मुलींना आणि मुलांना लागू होईल. यावर निर्णय देताना कर्नाटक उच्च न्यायालय म्हणते, विद्यापीठ आणि संबंधित कॉलेजचा निर्णय त्या मुलीला मान्य करावा लागेल. परंतु मुंबई उच्च न्यायालयाचा ड्रेसकोडबाबत वेगळा निर्णय आहे. तो कर्नाटक उच्च न्यायालयाने निरीक्षणात घेतला आहे की नाही, हे त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणातून दिसत नाही. यासंबंधी संपूर्ण निकाल आल्यावर मी त्यावर आपली भूमिका विस्ताराने मांडणार आहे,’ असंही आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकातील एका शाळेत हिजाब परिधान करण्यास विरोध करण्यात आल्याने देशभर वादंग निर्माण झाले होते. याबाबत आता कर्नाटक उच्च न्यायालयाने आपला निर्णय देत कर्नाटकमध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबबंदी कायम ठेवली आहे.