दिल्लीतील निजामुद्दीनं इथं भरवण्यात आलेल्या ‘मरकज’वरून देशात सध्या वादंग माजलं आहे. लॉकडाऊननंतरही ‘मरकज’ सुरू राहिल्यानं करोनाच्या फैलावाचा धोका वाढला आहे. करोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्यास तलबिगी जमातची मरकज कारणीभूत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही म्हटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुस्लिम सत्यशोधक मंडळानं एक पत्रक काढलं असून तबलिगी जमातवर जोरदार टीका केली आहे.
‘तलबिगींच्या वर्तनाचे पडसाद सोशल मीडियात उमटले. धार्मिक तेढ निर्माण होईल असा मजकूर शेअर करण्यात आला. त्यामुळं समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुही माजवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला. तसंच, पोलीस ठाण्यात काही गुन्हेही नोंदवण्यात आले. त्यामुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी ‘तबलिगींवर उपचार कसले करता? त्यांना गोळ्या घाला, लॉकडाउन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे, असं वक्तव्य केल्यामुळं पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. सर्वसामान्य मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल व करोनाच्या फैलावाला कारण ठरल्याबद्दल तबलिगींनी माफी मागावी, अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी केली आहे.
नियम पाळा, श्रद्धा घरापुरती मर्यादित ठेवा!
‘येत्या बुधवारी शब्बे बारात आहे. या निमित्त लोक मशिदीत नमाज आदा करतात आणि कब्रस्थानात जाऊन प्रार्थना करतात. काही दिवसांनी रमझान महिनाही सुरू होतोय. त्यावेळी महिनाभर उपास, नमाज, कुराण पठण केले जाते. सामुदायिक नमाज, गळाभेटी होतात. हे सर्व करोनाच्या फैलावास कारणीभूत होऊ शकते. त्यामुळं सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादित ठेवाव्यात. शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा आदर करून सर्व नियमांचं पालन करावं, असं आवाहनही मंडळानं केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times