सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हट्टा, आरळ आणि कुरुंदा या वेगवेगळ्या गावातील तिन्ही ठिकाणी असलेल्या मेडिकलची तपासणी करण्यात आली. या मुन्नाभाईकडे कोणते कागदपत्र आहेत, त्याची सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली. परंतु, कोणत्याही कागदोपत्रांची नोंद नसलेले हे मुन्नाभाई रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आलं. हे बोगस बंगाली डॉक्टर वैद्यकीय कोणतेही शिक्षण नसताना रुग्णांची तपासणी करून उपचार करत असल्याचे दिसून आलं. यांच्यावर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाकडून जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांचा मेडिकलसाठा सुध्दा जप्त करण्यात आला आहे. तर एका ठिकाणी कार्यवाहीसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाशी गावकऱ्यांनी हुज्जत घातली आहे.
आरोग्य विभागाकडून ही कार्यवाही करण्यात आल्यामुळे नागरिक चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. दिलेल्या अहवालानंतर, जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर इतर मुन्नाभाईंचे देखील चांगलेच धाबे दणाणले आहेत. शहरापासून काही अंतरावर असेलल्या दुर्गम भागातील गावामध्ये या बंगाली डॉक्टरांनी आपलं बस्तान मांडलं आहे. शहराचे अंतर बरेच राहत असल्यामुळे स्थानिक नागरिक यांच्याकडून उपचार करून घेतात.