‘झिरो कोव्हिड धोरणा’चा उदोउदो करणाऱ्या चीनला करोना विषाणू संक्रमणानं तोंडावर पाडलंय. करोना संक्रमित रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चीनच्या चिंतेत भर टाकलीय. परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या देशानं प्रमुख शहरासहीत अनेक भागांत लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे अनेक नागरिकांना स्वत:ला आपल्या घरातून कोंडून घ्यावं लागलंय. सध्या चीनमध्ये करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट BA.2 अत्यंत वेगानं फैलावताना दिसतोय.
BA.2 हा सब-व्हेरियंट सर्वात अगोदर दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. त्यानंतर चीनशिवाय आता हा व्हेरियंट पश्चिम युरोपमध्येही आढळून आलाय. चीनसारख्या देशांनी धोका ओळखून झिरो कोव्हिड धोरणावर आणि लसीकरणावर जोर दिला. त्यामुळे नागरिकांना रोगप्रतिकारक क्षमता मिळवण्यास मदत झाली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, BA.2 हा अत्यंत वेगानं फैलावणारा व्हेरियंट असला तरी तो व्यक्तीच्या जीवासाठी मात्र धोकादायक नाही.
चीन, पश्चिम युरोप आणि हाँगकाँगमध्ये करोनाचा प्रसार वेगात होत असताना शेजारील भारतातही करोना संक्रमणाची आणखी एक लाट येणार का? असा प्रश्न अनेकांना सतावतोय. तर याबद्दल भारताचे ‘कोविड टास्क फोर्स’चे अध्यक्ष नरेंद्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार, भारतात BA.2 मुळे करोना संक्रमणात वाढ होण्याची चिन्हं तशी कमीच आहेत. याचं कारण म्हणजे करोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान भारतातील ७५ रुग्ण याच सब-व्हेरियंटनं संक्रमित आढळून आले होते. आयआयटी कानपूरकडून जून महिन्यात नव्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आलीय. मात्र, हा धोका अधिक नसेल असं मानलं जातंय.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारत आणि चीनच्या स्थितीत मोठा फरक आहे. भारतातील करोनाच्या तिसऱ्या लाटेत मोठ्या संख्येत नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त होण्यास मदत झालीय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत जेवढ्या तेजीनं रुग्णसंख्या वाढली तितक्याच तेजीनं ही रुग्णसंख्या कमीदेखील झालेली दिसून आली.
दरम्यान, भारतात ६० हून अधिक वय असणाऱ्या नागरिकांसाठी बूस्टर डोसला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र बूस्टर डोस अनिवार्य करण्यात आलेला नाही.