प्रविण दरेकरांच्या अडचणीत भर; गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली – set back for bjp leader pravin darekar petition was dismissed by the mumbai high court
मुंबई : भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण मुंबै बँकेची निवडणूक लढवताना मजूर असल्याचं दाखवल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, ही दरेकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याप्रकरणी योग्य त्या कोर्टात याचिका दाखल करा, असं न्यायालयाकडून दरेकर यांना सांगण्यात आलं आहे. (Pravin Darekar News Today)
मजूर असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी मुंबईतील पोलीस ठाण्यात प्रविण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच पोलिसांकडून दरेकरांवर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिलासा मिळावा यासाठी दरेकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळल्याने दरेकरांच्या अडचणीत भर पडली आहे. शिवसेनेला मोठा धक्का, महिलेला मारहाण प्रकरणी आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
दरम्यान, प्रविण दरेकर यांच्यावर राज्य सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र ही कारवाई कायदेशीरच असल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांनी केला आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गातून निवडून आले होते. मात्र, निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरूच ठेवली होती. दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबै बँकेची निवडणूक लढविली होती त्या प्रतिज्ञा मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखवण्यात आले होते.