पुणे : कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या दोघांना सापळा लावून पकडण्यात आलं आहे. या आरोपींकडून सहा गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी तीन दुचाकींसह ८७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहेत. वाहन चोरी प्रकरणात आफताब उर्फ बडापाडा राजू पठाण (वय २१, रा.भाग्योदयनगर, कोंढवा) आणि घरफोडीच्या गुन्ह्यात दीपक उर्फ आकाश चंदू शेट्टी (वय २९, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द) याला अटक केली आहे. (Pune Crime News)

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, सहायक उपनिरीक्षक असगरअली सय्यद, हवालदार योगेश कुंभार, अमोल हिरवे, पोलिस नाईक तुषार आल्हाट, दीपक जडे आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी आफताब पठाण याच्याकडे चोरीची दुचाकी असून तो कोंढव्यातील शिवनेरीनगर येथे असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा लावून आफताबला ताब्यात घेतले.

प्रविण दरेकरांच्या अडचणीत भर; गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली

आफताब पठाण याची विचारपूस केली असता सदर दुचाकी त्याने आश्रफनगर येथून चोरी केल्याचे सांगितले. त्याने एकूण तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर, घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना दीपक शेट्टी हा घरफोडीचे गुन्हे करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या संशयावरुन त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने तीन घरफोड्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, घरफोडी करणाऱ्या आरोपीकडून ८७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here