मुंबई: राज्यात करोनामुळे आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. करोनामुळे आतापर्यंत ६० वर्षांवरील २० ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर ३० ते ५० वयोगटातील व्यक्तिंना करोनाची सर्वाधिक लागण झाल्याचंही आढळून आलं आहे.

राज्यात आतापर्यंत ७४८ जणांना करोनाची लागण झाली असून आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३१ ते ४० वयोगटातील १२८ जणांना करोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ४१ ते ५० वयोगटातील १३३ जणांना करोनाची लागण झाली असून या वयोगटातील ५ जणांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं आहे. ५१ ते ६० वयोगटातील ८८ जण करोनाबाधित असून ५ जण दगावले आहेत. तसेच ६१ ते ७० वयोगटातील ७३ जणांना करोनाची लागण झाली असून या वयोगटातील सर्वाधिक म्हणजे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय ७१ ते ८० वयोगटातील ७३ लोकांना करोनाची लागण झाली असून ४ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर ८१ ते ९० या वयोगटातील ९ लोक बाधित झाले असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

करोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. प्रयोगशाळेत आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६००८ नमुन्यांपैकी १४८३७ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर ७४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४६,५८६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३१२२जण संस्थात्मक क्वॉरंटाइन मध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता. त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे. तर त्यांच्या निकटसहवासितांपैकी ५ जण पिंपरी चिंचवड येथे येथे करोना बाधित आढळले आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी ५१९ टीम काम करत आहेत. तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४३९ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. नवी मुंबई मनपा क्षेत्रात १९६ टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. राज्यात या प्रकारे एकूण ३०७८ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here