अहमदनगर : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका वक्तव्यावरून नाभिक समाजात निर्माण झालेला असंतोष कायम आहे. दानवे यांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आल्यानंतर आता थेट त्यांच्या राजीनाम्याचीच मागणी करण्यात येत आहे. बहुजन समाजाला आपली जहागिरी समजून बेताल वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी नाभिक महामंडळाने केली आहे. (Raosaheb Danve Controversy)

यासंबंधी नाभिक महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. दानवे यांचा राजीनामा घ्यावा, त्यांनी माफी मागावी अन्यथा राज्यभर मुंडण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. जालना येथील एका भाषणात दानवे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना तिरुपती येथील नाभिकांचे उदाहरण दिले होते. तेथील नाभिकांप्रमाणे राज्य सरकारचे काम अर्धवट असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केले होते. याबाबत राज्यभरातील नाभिक समाजाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

sonia gandhi : सोनिया गांधी लोकसभेत संतापल्या; बोलल्या, ‘लोकशाही हॅक करण्याचा… ‘

यासंबंधी नाभिक महामंडळाने म्हटलं आहे की, राजकीय भाषणे देताना बहुजन समाजाची उदाहरणे देण्यासाठी बहुजन समाजातील जाती दानवे यांच्या जहागिरी नाहीत. तीन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असंच आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता दानवे यांनी नाभिक समाजाची बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा. दानवे यांनी आठ दिवसांत नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा जालना येथे दानवे यांच्या घरासमोर राज्यातील नाभिक समाज एकत्रित येऊन मुंडण आंदोलन करेन आणि ते केस दानवे यांना दान करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी दानवेंविरोधात निषेधाच्या घोषणा देत तीव्र असंतोष व्यक्त केला. आता निवेदने, निषेध करुन गप्प न बसता तीव्र आंदोलन उभे करुन अशा बेताल बोलणाऱ्या मंत्र्यांना जागा दाखवावी, लागेल अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष माऊली गायकवाड, शहराध्यक्ष श्रीपाद वाघमारे, महिला जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे, कार्याध्यक्ष विशाल सैंदाणे, सचिव बापुसाहेब औटी, मुरलीधर मगर, बाबुराव दळवी, रघुनाथ औटी, संतोष जाधव, पांडुरंग शिंदे, अक्षय कलंके, रमेश बिडवे, संतोष भालेराव, प्रदीप पवार, योगेश पिंपळे, अविनाश जाधव, बाळासाहेब खंडागळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here