कोल्हापूर : महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचे नेते इतर घटकपक्षांना किंमतच देत नसल्याचा आरोप करत नाराजी वाढली आहे. ही नाराजी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त करून महिना उलटला तरी त्यावर काहीच उत्तर मिळालं नसल्याने आघाडीतून बाहेर पडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या ५ एप्रिल रोजी कोल्हापुरात संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक होत असून त्यामध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. (Raju Shetti Against Maha Vikas Aghadi)

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यानंतर महाविकास आघाडीमध्येही संघटना सहभागी झाली. सरकारला दोन वर्षे झाली तरी संघटनेला निर्णय प्रक्रियेत कुठेच स्थान दिले जात नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे सर्वच नेते नाराज आहेत. वीज पुरवठा, महापूर नुकसान भरपाई, पीक विमा, प्रोत्साहन अनुदान यासह काही मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी वाढत आहे. यातून आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला जात आहे.

आमदार, त्यांचे पीए आणि ड्रायव्हर; एकाच घोषणेत अजित पवारांनी सगळ्यांना खूश केलं!

फेब्रुवारी महिन्यात शेट्टी यांनी पवारांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवरा, नाही तर ही आघाडी कोसळेल असा इशारा त्यांनी पत्रात दिला होता. एक महिन्यानंतरही यावर पवारांनी कोणतंच उत्तर दिलं नाही. सरकारकडूनही अनुकूल वातावरण तयार झाले नाही. यामुळे पुढील महिन्यात आघाडीतून बाहेर पडण्याबाबत शेतकरी संघटनेच्या हालचाली वाढल्या आहेत.

काय म्हणाले राजू शेट्टी?

शेतकरी संघटना महाविकास आघाडी बाहेर पडणार असल्याच्या चर्चेबाबत राजू शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘संघटना महाविकास आघाडीवर नाराज आहे, यामध्ये दुमत नाही. ही नाराजी आम्ही वेळोवेळी उघडपणे व्यक्त केली आहे. आघाडीतच राहायचे की बाहेर पडायचे हा धोरणात्मक निर्णय आहे. यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीतच याबाबत निर्णय घेतला जाईल,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here