मुंबई: केंद्रीय तपासयंत्रणांकडून महाविकासआघाडीच्या नेत्यांवर सुरु असलेल्या कारवाईला शह देण्यासाठी आता ठाकरे सरकारनेही भाजप नेत्यांना अडचणीत पकडण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामध्ये मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राणे पितापुत्र आणि प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आगामी काळात नील सोमय्या, किरीट सोमय्या, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. यावरून भाजपचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. संजय पांडे हे महाविकासआघाडीच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहेत. हा वाद सुरु असतानाच गुरुवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी संजय पांडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, यावरून आता राजकीय वर्तुळात निरनिराळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि नार्वेकर (Milind Narvekar) यांनी पोलीस आयुक्तांच्या घेतलेल्या भेटीमागे कोणते नियोजन असावे? आगामी काळात भाजपच्या आणखी एका नेत्यावर कारवाई किंवा गुन्हा दाखल होणार होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Nitesh Rane: प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल होताच नितेश राणेंचा गंभीर आरोप
यापूर्वी दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांची पोलीस चौकशी झाली होती. सत्र न्यायालयाने या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने तुर्तास राणे पितापुत्रांना दिलासा मिळाला आहे. तर मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांनीही अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून भाजप नेत्यांवरील कारवाईला वेग आलेला दिसत आहे. किंबहुना ठाकरे सरकारने यासाठीच संजय पांडे यांना आयुक्तपदावर बसवल्याची चर्चा आहे. यापूर्वीचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त प्रकरणे समोर येऊनही कारवाईत तत्परता दाखवली नव्हती. त्यामुळेच हेमंत नगराळे यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. आता संजय पांडे यांच्या निवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. या काळात संजय पांडे भाजप नेत्यांवर कारवाईचा सपाटा लावतील, असा अंदाज बांधला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here