वृत्तसंस्था, नवी दिल्लीः युरोप तसेच पूर्ण आशियातील देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा करोनाबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

जगभरातील करोना रुग्णांची संख्या घटल्याने २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय अलीकडेच केंद्र सरकारने जाहीर केला. या निर्णयाची तयारी तसेच लसीकरणाची प्रगती याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मालविया यांनी बुधवारी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी युरोप व पूर्व आशियातील देशांमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. चीन, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, व्हिएतनाम, सिंगापूर व काही युरोपीयन देशांमध्ये पुन्हा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा जेनोमिक सिक्वेन्सिंग हाती घ्यावे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दक्षता बाळगावी, असा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिल्याचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. या बैठकीस जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले, औषध विभागाच्या सचिव एस. अपर्णा, नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य व्ही. के. पॉल, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव तसेच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया उपस्थित होते.

चीनमध्ये पत्राद्वारे फैलाव

नवी दिल्ली : चीनमधील अलीकडील अभ्यासात बीजिंगमधील ओमायक्रॉन संसर्गाचा स्रोत पोस्टाने मिळालेल्या पत्रात सापडला आहे. मात्र, येथील तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला देत अद्यापही विषाणूचा फैलाव हवेतूनच मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट केले आहे. जानेवारीमध्ये पोस्टाच्या पाकिटामध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनचा प्रकार चीनमधील इतर प्रकारांपेक्षा जनुकीयदृष्ट्या वेगळा होता; परंतु दक्षिणपूर्व आशिया आणि उत्तर अमेरिकेत आढळलेल्या प्रकारांशी जुळणारा होते, असे बीजिंगमधील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी)ने केलेल्या अभ्यासात असे नमूद केले आहे. करोनाचा प्रसार वस्तूंच्या पृष्ठभागावरून होतो, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत, असे रोगप्रतिकार तज्ज्ञ सत्यजित रथ यांचे म्हणणे आहे. ‘पृष्ठभागांवरून विषाणू संक्रमणाबाबतचे पुरावे, पाठपुरावा आणि निरीक्षणाचा कालावधी यातील तफावत लक्षणीय आहे. त्यामुळे, सार्वजनिक आरोग्याबाबतचे धोरण बनवण्यासाठीचा आधार म्हणून याबाबत मी सावधपणे विचार करेन,’ असे दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीमध्ये कार्यरत असलेले रथ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here