रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा २२ वा दिवस आहे. दरम्यान, पूर्वनियोजित योजनेनुसार युक्रेनवर चढाई सुरू असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय. याच दरम्यान युक्रेनच्या टीव्ही चॅनलवर राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या आत्मसमर्पणाचा एक व्हिडिओ झळकला. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरणही निर्माण झालेलं दिसलं.
रशियन हॅकर्सनं टीव्ही चॅनल ‘युक्रेना २४‘ च्या लाईव्ह न्यूजफीडमध्ये बाधा निर्माण करतानाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या आत्मसमर्पणाचा एक नकली व्हिडिओ या चॅनलवरून प्रदर्शित केला. शत्रुला नामोहरम करण्यासाठी ही रशियाकडून करण्यात आलेली वेगळी खेळी ठरली. फेसबुकवरून हा व्हिडिओ हटवण्यात आला आहे.
मात्र, हे ध्यानात आल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी तातडीनं आपला एक व्हिडिओ प्रदर्शित केला. ‘मित्रांनो, आम्ही याबद्दल अनेकदा सतर्क केलेलं आहे. हा नकली व्हिडिओ आहे. कुणीही आत्मसमर्पण केलेलं नाही, आणि करणार नाही कमीत कमी तेव्हापर्यंत जेव्हापर्यंत युक्रेनियन सेना रशियन सेनेला धोबीपछाड देत आहे. मी सल्ला देईन की रशियन सेनेनंच आपले हत्यारं टाकून घरी निघून जावं’ असं झेलेन्स्की यांनी आपल्या व्हिडिओत म्हटलंय.
‘आम्ही आमच्या घरात आहोत, आमच्या जमिनीवर, आपल्या मुलांची आणि आपल्या कुटुंबीयांचं संरक्षण करत आहोत. त्यामुळे जेव्हापर्यंत विजय हाती येणार नाही तेव्हापर्यंत आम्ही हत्यारं टाकणार नाही’, असं आश्वासन आणि प्रोत्साहनही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या नागरिकांना दिलंय.
बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं रशिया – युक्रेन युद्धावर निर्णय सुनावताना रशियाला तत्काळ आपली सैन्य कारवाई रोखण्याचे आदेश दिले. या वादात रशियाच्या वतीन आणखी कोणत्याही पक्षानं दखल देऊ नये, न्यायालयाचा निर्णय सर्वांसाठी बाध्य असेल, असंही ‘आयसीजे’नं म्हटलं. उल्लेखनीय म्हणजे, आयसीजेचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत सर्वांसाठी बाध्य आहे.
या निर्णयासंबंधी बोलताना झेलेन्स्की यांनी ‘आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाविरुद्ध युक्रेननं विजय मिळवल्याची’ प्रतिक्रिया व्यक्त केली.