शहराच्या पूर्व भागातील गावदेवी मंदिराशेजारी भव्य अशी यूपीएससी भवनाची दोन मजली इमारत बांधण्यात आली आहे. त्यासाठी साधारण तीन कोटी रुपयांचा निधी खर्च झाला होता. आतील फर्निचरसाठी आता नव्याने साधारण अडीच कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात हे यूपीएससी सेंटर सुरू होऊ शकले नव्हते. मात्र, आता लवकरच हे स्पर्धा परीक्षांसाठीचे केंद्र सुरु होणार आहे. मात्र, त्याआधीच या वास्तूमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दारूपार्टी होत असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नगरपालिकेचे सफाई कर्मचारी आणि मुकादम एकत्र येऊन या इमारतीमध्ये दारू पार्टी करत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी त्या ठिकाणी पाहणी करून या सगळ्यांनाच चांगलेच धारेवर धरले. यासंदर्भातील एक पत्र देखील अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिले आहे. मात्र, अद्याप त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाहीये. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून असा गैरप्रकार होत असेल तर टीका कुणावर करायची कशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या इमारतीच्या संरक्षणासाठी नगरपालिकेच्या वतीने सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. मात्र अशा प्रकारच्या दारू पार्टी या इमारतीत होत असतील तर हे सुरक्षा रक्षक नेमके करतात काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे. याबाबत अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.