मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स‘ हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या काही आमदारांनी विधानसभेत केली होती. त्याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ठाकरे‘ हा चित्रपट टॅक्स फ्री करा अशी मागणी आम्ही केली नाही, असे राऊत म्हणाले होते. त्यावर भाजपनं उत्तर दिले आहे. ‘ठाकरे’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ या दोन्ही चित्रपटांची तुलना करतानाच, भाजपनं त्यांच्या ट्विटर हँडलवरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ‘ठाकरे’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. पण लोकांनी त्या चित्रपटाला प्रतिसाद दिला नाही. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला लोक डोक्यावर घेत आहेत, तर तुमच्या पोटात का दुखत आहे, अशा शब्दांत भाजपनं राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
भाजपचे ट्विट, संजय राऊतांवर निशाणा
महाराष्ट्र विधानसभेत भाजपच्या सदस्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला राज्यात टॅक्स फ्री करण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांनी आज, गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. ‘द कश्मीर फाइल्स’चं काय, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरही ‘ठाकरे’ हा सिनेमा आम्ही बनवला आहे, तोही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नाही. आम्ही अशी मागणी कधीही केली नाही, असं राऊत म्हणाले होते. द कश्मीर फाइल्सवरून जे राजकारण चाललं आहे, ते योग्य नाही. काश्मीरबद्दल शिवसेनेच्या काय भावना आहेत, हे संपूर्ण देश चांगलं जाणून आहे, असंही राऊत म्हणाले होते.
राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर भाजपने ट्विट करून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत, तुम्हाला आठवत नसेल, दोन्हीकडचे उंबरे झिझवण्यात तुमचा वेळ जात आहे. तुम्हाला आठवण करून देतो. ‘ठाकरे’ नावाचा चित्रपट काढला होता. पण, लोकांनी त्या चित्रपटाला प्रतिसाद दिला नाही. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला लोक डोक्यावर घेत आहेत, तर तुमच्या पोटात का दुखत आहे? असं भाजपनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.