: नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा महान खेळाडू त्याच्या नावामुळे, कामामुळे जगभरात खूप लोकप्रिय आहे आणि त्याची जर्सी देखील खूप प्रसिद्ध आहे. धोनीने आयपीएल २०२२ ला सुरुवात होण्याअगोदर जर्सी क्रमांक ७ निवडण्यामागे काय कारण होते, याचा खुलासा केला आहे. ७ क्रमांकाशी संबंधित अंधश्रद्धांचे त्याने खंडन केले आहे.

चेन्नई सुपर किंग्जची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्सने एका आभासी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी धोनीने त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. धोनी म्हणाला की, ‘७ हा एक असा क्रमांक आहे, जो माझ्या हृदयाच्या जवळ आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांकडून ७ क्रमांकाच्या महत्त्वाविषयी ऐकले आहे, पण हा जर्सी क्रमांक निवडण्यामागे एक साधे कारण आहे.’

धोनी पुढे म्हणाला की, “बर्‍याच लोकांना सुरुवातीला वाटले की, ७ हा माझ्यासाठी लकी नंबर आहे, पण मी अगदी साध्या कारणामुळे हा क्रमांक निवडला. माझा जन्म ७ जुलै रोजी झाला. सातव्या महिन्यातील सातवा दिवस असल्याने मी तोच निवडला, एवढंच कारण होतं.”

क्रीडाविश्वात खेळाडूंची ओळख त्यांच्या कामगिरीवरून, त्यांच्या चाहत्यांवरून आणि त्यांच्यातील वादांवरून होते. अनेक खेळाडूंचा जर्सी क्रमांकही त्यांच्या चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरतो आणि सहसा खेळाडूंना विशिष्ट कारणासाठी किंवा त्यांच्या आवडीनुसार जर्सी क्रमांक निवडायला आवडते. ७ क्रमांक हा आणखी काही जगप्रसिद्ध खेळाडूंशी जोडला गेला म्हणून तो आणखी प्रसिद्ध झाला आहे. दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोही ७ क्रमांकाची जर्सी घालतो. तो स्वत: एक ब्रँड बनला आहे. तसेच भारताचा विश्वचषक विजेता माजी कर्णधार धोनीच्या बाबतीतही घडले आहे.

धोनीने २००७ टी-२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवले. आयपीएलमध्येही धोनीने चेन्नई सुपर किंग्जला चार विजेतेपदे मिळवून दिली आहेत. आता आयपीएलच्या या पुढच्या हंगामात धोनी पुन्हा मैदानात उतरणार आहे. त्यावेळी धोनी चेन्नईला जेतेपद जिंकवून देणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here