मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अजित पवार, छगन भुजबळ आणि इतर दिग्गज नेतेही सामील झाले आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वारंवार होत असलेल्या आरोपांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचे, तसंच पक्षाची आगामी काळातील वाटचाल यादृष्टीने आज शरद पवार यांनी ही तातडीची बैठक (Sharad Pawar Meeting With Party Leaders) बोलावली आहे. या बैठकीत पक्षाचे नेते व कॅबिनेट मंत्री आणि ईडीच्या कारवाईनंतर सध्या अटकेत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik News Today) यांच्यावर असलेली जबाबदारी काढून घ्यायची की नाही, याबाबतही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नवाब मलिक यांनी मंत्रिपदाची राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून जोरकसपणे करण्यात येत आहे. या मागणीसाठी भाजपने राज्यभरात आंदोलनही केलं. मात्र भाजपच्या दबावाला बळी पडून मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही, असा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत झाल्याचं समजते. भाजपच्या आरोपांनंतर बचावात्मक भूमिका न घेता आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्यात यावं, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत व्यक्त केली आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.

pravin darekar: प्रवीण दरेकरांवर कारवाई होणार का?; सत्र न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेतली जाणार?

नवाब मलिक यांच्या खांद्यावर मंत्रिपदासोबतच राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाचीही जबाबदारी आहे. एकीकडे मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्यााबाबत पक्षातील नेत्यांचं एकमत होताना दिसत असलं तरी दुसरीकडे मलिक यांना मुंबई शहराध्यक्षपदावरून दूर करण्यात यावं का, याबाबतही वरिष्ठ नेत्यांमध्ये खल सुरू आहे. राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांच्या जागी पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेतील नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींबाबत अद्याप राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याकडून अधिकृतरित्या भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीकडून नेमका काय निर्णय जाहीर केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here