जळगाव : शहरातील नेरीनाका येथे कर्तव्य बजावणार्‍या वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत छेड काढणाऱ्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना आज घडली. या दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात विनयभंगासह शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीमखान आरमानखान पठाण (वय-५१, रा. पाळधी, मोहल्ला ता. धरणगाव) असं संशयित दुचाकीस्वाराचं नाव आहे. (Women Traffic Police)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी या गुरूवार १७ मार्च रोजी नेरी नाका येथे कर्तव्य बजावत होत्या. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सलीमखान आरमानखान पठाण हा कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारीजवळ आला. त्याने तिला दुसर्‍या आणखी एका महिला पोलीस कर्मचार्‍याचा मोबाइल क्रमांक मागितला. नंबर नसल्याचं सांगितल्यावर तो कर्तव्य बजावत असलेल्या महिला कर्मचाऱ्यावर धावून गेला. त्याने कर्मचारी महिलेला शिवीगाळ करत तिचा हात पकडला आणि तुझी नोकरी घालवतो असा दम दिला.

धक्कादायक! ११ वर्षांच्या लेकीसह बापाने केली आत्महत्या; परिसरात हळहळ

घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी गोंधळ घालत असलेल्या सलीमखान आरमानखान पठाण यास चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळाल्यावर शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तसंच शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी आले. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून सलीमखान याला बाजूला घेऊन रिक्षातून पोलीस ठाण्यात नेले.

दरम्यान, याप्रकरणी वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारीने दिलेल्या फिर्यादीवरुन सलीम खान याच्याविरोधात विनयभंगासह शासकीय कामात अडथळा निर्माण आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here