यावेळी शरद पवार यांनी मविआ सरकारमधील तरुण आमदारांना भाजपच्या नेत्यांकडून काही गोष्टी शिकून घ्या, असे सांगितले. भाजप नेते कशाप्रकारे काम करतात, ते पाहा. निवडणूक लढवताना भाजप किती नियोजनबद्ध व्यूहरचना आखते, हे शिकून घ्या. तसेच भाजपचे नेते आपल्या कामाचं मार्केटिंग किती उत्तमप्रकारे करतात, ही देखील शिकण्यासारखी गोष्ट असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
सध्या भाजपने अधिवेशनात महाविकासआघाडी सरकारला जेरीस आणले आहे. यासंदर्भातही शरद पवार यांनी युवा आमदारांसमोर भाष्य केले. मी राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येऊ देणार नाही. त्यामुळे घाबरू नका, असे सांगत शरद पवार यांनी त्यांना आश्वस्त केले. त्यामुळे आता आगामी काळात महाविकास आघाडीची तरुण फळी कशाप्रकारे काम करणार, हे पाहावे लागेल.
आदित्य ठाकरे यांना अजितदादांचं मार्गदर्शन
गेल्या काही काळात राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांकडून राजकारणाचे आणि प्रशासकीय कौशल्याचे धडे शिकताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका आणि महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत भाग घेताना दिसतात. विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आदित्य ठाकरे यांच्याशी सातत्याने संवाद साधताना दिसतात. महाविकास आघाडीच्या अनेक बैठकांना आदित्य ठाकरे उपस्थित असतात. मध्यंतरी अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईत एक पाहणी दौराही केला होता. यावेळी आदित्य ठाकरे आणि अजितदादा एकाच गाडीत होते. आदित्य ठाकरे ही गाडी चालवत होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते.