रशिया आणि युक्रेन युद्धाला आजचा २३ वा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश धुडकावून लावत रशियाचा युक्रेनवर हल्ला सुरूच आहे. याच दरम्यान रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची अभिनेत्री ओक्साना श्वेत्स हिचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय.
‘यंग थिएटर’कडून बातमीला दुजोरा
एका रहिवासी इमारतीवर रशियाकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात ओक्साना यांना आपला जीव गमवावा लागला. ओक्साना यांच्या मृत्यूच्या बातमीची त्यांच्या ‘यंग थिएटर’कडून एका निवेदनाद्वारे पुष्टी करण्यात आलीय. ‘कीव्हमधील निवासी इमारतीवर झालेल्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनमधील एक कलाकार ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू झाला’ असं या निवेदनात म्हटलं गेलंय.
ओक्साना श्वेत्स या ६७ वर्षांच्या होत्या. युक्रेनच्या सर्वोच्च कलात्मक सन्मानांपैकी एका पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. व्यापकपणे ‘युक्रेनचा सन्मानित कलाकार‘ म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो.
‘पुतीन युद्ध गुन्हेगार’
रशिया युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर निशाणा साधलाय. बायडेन यांनी पुतीन यांना ‘युद्ध गुन्हेगार’ आणि ‘मारेकरी’ संबोधलंय. व्हाईट हाऊसला संबोधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
तर बायडेन यांच्या विधानावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलीय. ‘राष्ट्रप्रमुखाचं अक्षम्य वक्तृत्व’ म्हणत रशियानं बायडेन यांना प्रत्युत्तर दिलंय.