नाशिक: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या करोना विषाणूने आता शहरातही धडक मारली आहे.शहरात एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून शहरवासीयांच्या उंबऱ्यापर्यंत हा विषाणू पोहोचला आहे.त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

जिल्ह्यात २७ एप्रिलला पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला. निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील हा रुग्ण सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याची प्रकृती बरी असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली. या रुग्णाच्या माध्यमातून करोना विषाणूने जिल्ह्यात शिरकाव केला असला तरी गेल्या दहा-बारा दिवसांत एकाही बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. परंतु सोमवारी आणखी एक रुग्ण बाधितअसल्याचे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे बाधित रुग्ण हा नाशिक शहरातील रहिवासी असल्याने करोना विषाणूने शहरातही धडक मारल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विषाणू आता पुणे मुंबईप्रमाणेच नाशिकच्या शहरवासीयांच्या उंबऱ्यापर्यंत आला असून नागरिकांनी यापुढील काळात अत्यंत सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे आवाहन मांढरे यांनी केले आहे.

संबंधित व्यक्ती गोविंद नगरची

आढळून आलेला बाधित रुग्ण शहरातील गोविंद नगर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. ही व्यक्ती कामानिमित्त दिल्ली येथे गेली होती, अशी माहिती पुढे येत असून अधिकृत सूत्रांकडून मात्र त्यास अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here