नाशिक : राज्यातील करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने विविध शहरांतील निर्बंध शिथिल केले जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal In Nashik) यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील निर्बंध (Nashik Restrictions) कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे. सोमवारी नवीन नियमावली प्रशासनाकडून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे नाशिकरांना मंगळवारी रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करता येणार आहे.

रहाडीत रंगपंचमी साजरी करण्यासाठी तयारीला लागा, असं पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरच मंडळांना सांगितलं आहे. त्यामुळे शहरात रंगपंचमी जल्लोषात साजरी होणार आहे. करोना प्रादुर्भावाबाबतचे विविध निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी डीजेबाबत मात्र सोमवारी निर्णय होणार आहे.

ओमिक्रॉनच्या डबल व्हेरियंटनं वाढवलं टेन्शन, करोनाची नवी लाट येणार का? सर्व काही जाणून घ्या!

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

पोलीस आयुक्तांसह प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले, याबाबत छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. यावेळी भुजबळ म्हणाले की, ‘मुंबई-पुण्यासह राज्यातील १२-१५ जिल्ह्यांमध्ये १०० टक्के निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधीलही निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे मी आजच्या बैठकीत पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली असून निर्बंध हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहे. याबाबतची नियमावली सोमवारी जाहीर केली जाईल.’

दरम्यान, सण साजरे करण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात येत असले तरी नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कायम ठेवावा, असं आवाहनही छगन भुजबळ यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here