गेल्या २२ दिवसांपासून युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांवर हल्ले केले जात आहेत. गुरुवारी पूर्व युक्रेनच्या एका भागात रशियन सेनेनं केलेल्या गोळीबारात जवळपास २१ लोक ठार तर २५ जण जखमी झाल्याचं समजतंय.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे खारकीव्ह शहराबाहेरील मेरेफा शहरातील एका शाळा आणि सांस्कृतिक केंद्रावर गोळीबार करण्यात आला. जखमींपैंकी १० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर येतंय.
या गोळीबारानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये एक इमारत दिसून येतेय जी मधोमध गोळीबारामुळे उद्ध्वस्त झालीय. तसंच अनेक खिडक्या तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.
युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर खारकीव्ह मेरेफापासून ३० किलोमीटर (१८ मैल) अंतरावर उत्तरेत स्थित आहे. रशियाकडून टार्गेट करण्यात आल्यानंतर उद्ध्वस्त झालंय.
याच दरम्यान, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन युद्धात अलीकडच्या काही दिवसांत रशियन सैन्यालाही जमीन, समुद्र आणि हवाई हल्ल्यांत फारच कमी यश मिळालंय. त्यामानाने, रशियाला पूर्व युरोपीय देशात मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. तर दुसरीकडे युक्रेनचा प्रतिकार ठाम आणि समन्वित राहिलाय. सर्व प्रमुख शहरांसह युक्रेनचा बहुतांश भाग युक्रेनच्या नियंत्रणाखाली आहे.
युक्रेन परराष्ट्र मंत्रालयानं केलेल्या दाव्यानुसार, या युद्धात रशियन सैन्याला मोठं नुकसान सहन करावं लागतंय. रशियाच्या जवळपास १४ हजार सैनिकांना या युद्धात जीव गमवावा लागल्याचा दावा युक्रेननं केलाय. तसंच रशियाचे ८६ विमानं, १०८ हेलिकॉप्टर्स आणि ४४४ टॅंक युक्रेनकडून उद्ध्वस्त करण्यात आलेत. याचसोबत, ४३ अँटी एअरक्राफ्ट वॉरफेअर सिस्टम्स, ८६४ गाड्या, २०१ तोफा, १४५५ आर्मर्ड व्हेईकल्स आणि १० विशेष उपकरणांचं नुकसान रशियाला सोसावं लागल्याचा दावा युक्रेननं केलाय.