‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही झी मराठीवरून प्रसारित होणारी मालिका सध्या खूपच गाजत आहे. या मालिकेतून श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या दोघांनी या मालिकेत अनुक्रमे यशवर्धन चौधरी आणि नेहा कामत या भूमिका साकारल्या आहेत. परंतु या दोघांहून जास्त लोकप्रियता चिमुकल्या परीनं अर्थात मायरा वायकुळ हिला मिळाली आहे. सध्या या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपलं आहे. यश आणि नेहाची प्रेमकहाणी हळूहळू फुलत चालली आहे. त्यांची ही प्रेमकहाणी लग्नापर्यंत येऊन पोहोचली आहे. परंतु परीनं अद्याप यशला बाबा म्हणून स्वीकारलेलं नाही. आता परीला मनवण्यासाठी यश त्याच्या परीनं प्रयत्न करत आहे. त्याच्या या प्रयत्नांना यश येईल अशी शक्यता निर्माण झाल्याचं मालिकेच्या आगामी प्रोमोमधून दिसत आहे. मालिकेतील अपकमिंग भागांचे काही व्हिडिओ निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेत पुढं काय होणार याची उत्सुकता लागली आहे.
पहिल्या प्रोमोमध्ये नेहाच्या सोसायटीमध्ये सर्वजण धुळवड खेळताना दिसत आहे. त्यावेळी परी यशला विचारते, ‘फ्रेंड तुला आई आवडते ना?’ त्यावर यश तिला म्हणतो की, ‘तुझ्या आईलाही मी आवडतो आणि मलाही आई आवडते. मी आणि आईने लग्न केलं तर चालेल का?’ यशनं घाबरत विचारलेल्या प्रश्नावर परी त्याला म्हणते की, ‘मला आधी तुझा इंटरव्ह्यू घेऊ दे, मग विचार करून सांगते.’ आता परी यशची मुलाखत घेण्याचा सिक्वेन्स येत्या काही भागात पाहायला मिळणार आहे.
त्यानंतर वाहिनीनं मालिकेच्या आगामी भागाशी संबंधित आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये परी यशची मुलाखत घेणार असल्यानं यश तिला भेटवस्तू, ड्रेस असं बरंच काही देतो. हे सगळं पाहून परी त्याला म्हणते की, ‘मला मस्का नको मारूस हा. हा ड्रेस घातला म्हणजे माझा होकार नाही हं…’ त्यावर यश म्हणतो, ‘अगदी आईवर गेली आहे….’ त्यानंतर परीला घेऊन तो आलिशान गाडीतून मोठ्या हॉटेलमध्ये जातो. तिथं परी त्याला विचारते की, ‘काय म्हणणं आहे तुझं?’ यश तिला म्हणतो, ‘मला नेहाशी लग्न करायचं आहे.’ त्यावर परी त्याला विचारते ‘काय काम करतोस तू.. किती कमावतोस… आईला गाणं आवडतं की डान्स…मला जर एखादा प्राणी घरात आणायचा असेल,तर कोणता आणशील…’ अशा विविध प्रश्नांची सरबत्ती यशवर करते. परीचे हे प्रश्न ऐकून यशला घाम फुटतो. त्याचवेळी यश तिथं बसलेल्या नेहाकडं हताशपणं बघताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मालिकेच्या आगामी भागाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये परी खूपच गोड दिसत आहे.
मोहन जोशींऐवजी प्रदीप वेलणकर आजोबांच्या भूमिकेत

दरम्यान, माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशवर्धन चौधरी याचे आजोबा जगन्नाथ चौधरी ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारत होते. परंतु गेल्या भागांपासून मोहन जोशी मालिकेतून गायब झाले आहेत. आता मालिकेच्या आगामी भागांचे जे प्रोमो शेअर झाले आहेत त्यात मोहन जोशींऐवजी प्रदीप वेलणकर दिसले आहेत. याचा अर्थ या मालिकेतून मोहन जोशी बाहेर पडले आहेत. मात्र, यामागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप निर्माते, वाहिनीनं स्पष्ट केलेलं नाही.