सांगलीत उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळ्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते २ एप्रिल रोजी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादीने केलं आहे. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी त्याला जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आज भाजपचे नगरसेवक आणि आमदारांची बैठक पार पडली.
अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते होण्यापूर्वीच २६ मार्च रोजी भाजप नेत्यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करावं, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे स्मारकाचे लोकार्पण आणि श्रेयवादावरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील काही राजकीय पुढाऱ्यांचे कर्ज आणि त्यावरील व्याज माफ करण्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांच्या संस्थांनी घेतलेलं सुमारे १७६ कोटी रुपयांचे कर्ज माफ झालं तर, बँकेच्या कामकाजावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लवकरच या संदर्भातील सखोल माहिती घेऊन सत्ताधाऱ्यांचा डाव उधळून लावू, असा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे.