साक्री शहरातील तरुण धुळवडीचा उत्सव डीजेसमोर नाचत साजरा करत होते. मात्र याचवेळी दोन गटांमध्ये अचानक वाद झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला आणि काही तरुणांनी थेट धारदार शस्त्रांनी एकमेकांवर वार करण्यास सुरूवात केली. या हाणामारीमध्ये जवळपास सात ते आठ जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमींमध्ये महिलांचा देखील सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हल्ल्यातील सर्व जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. वाद वाढल्यानंतर डीजेदेखील घटनास्थळी फोडण्यात आला. पोलीस प्रशासनातर्फे यासंदर्भात साक्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत.
दरम्यान, सण साजरा करत असतानाच घडलेल्या या घटनेनं शहरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.