सामना कधी आणि कुठे पाहायचा?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारी (१९ मार्च) होणारा सामना हा भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३० वाजता सुरू होईल. या सामन्याची नाणेफेक सकाळी ६ वाजता होणार आहे. महिला विश्वचषक स्पर्धेतील हा १८ वा सामना ऑकलंडमधील ईडन पार्क मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल. तसेच लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह डिस्ने+हॉटस्टारवर ऑनलाइनही पाहता येईल. याशिवाय आमच्या maharashtratimes.com वरही तुम्ही या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता.
यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. हरमनप्रीत कौरने भारतासाठी नाबाद १७१ धावांची तुफानी खेळी खेळली होती, जी विश्वचषकातील सर्वात जबरदस्त खेळींपैकी एक आहे. शनिवारी होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाला फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताला इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने एक टिप्सही दिली आहे. हुसेन म्हणाले की, ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी चांगले खेळणे पुरेसे नाही आणि शफाली वर्मा भारताला या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी आवश्यक असलेली विलक्षण ऊर्जा देऊ शकते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यानच हुसेन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ‘मी शफाली वर्मासोबत जाईन. ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी फक्त चांगले खेळणे पुरेसे नाही. तुमच्याकडे विलक्षण असं काहीतरी पाहिजे आणि शफाली तुम्हाला ती विलक्षण ऊर्जा देऊ शकते.’ त्यामुळे आता या सामन्यात शेफालीला भारतीय संघात स्थान मिळणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.